Sunday, July 19, 2009

आठवणी

अशाच आठवणी मग ऋतू बदलतात
ग्रीष्मातल्या पानांप्रमाणे त्याही सुकून जातात
हिरवा रंग प्रेमाचा विरळ होत जातो
जाळीदार पानांप्रमाणे मनाला छिद्रे पडतात

खूप यत्न केला तरी छिद्रे भरत नाहीत
रडावस वाटल तरी आसव गळत नाहीत
डोळे मिटले की भूतकाळात मन धावत
म्रुगजळामागे पळताना वेड मन थकत

अशा वेळी वाटत नको त्या आठवणी
नको ते डोळ्यात काठोकाठ भरलेले पाणी
तेव्हा कोठे अंधार्‍या रात्रीसारख हसावस वाटत
एखादा तारा तुटल्यावर काजव्यांशी खेळावस वाटत
:- अजय कोरपे


Friday, July 10, 2009

पानिपत(Panipat) - (तिसरे युद्ध: मराठा - अहमदशाह अब्दाली)

छत्रपती शिवाजी महाराज यानी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या सीमा अटकेपार नेणार्‍या पेशव्यांच्या काळात पानिपताच्या मैदानात घडलेल्या मराठा आणि अहमदशाह अब्दाली यांच्या युद्धात मराठयांची एक संपूर्ण पिढी मारली गेली. त्या युद्धात वीरमरण पावलेल्या सर्व ज्ञात आणि अज्ञात सैनिकांना माझा मानाचा मुजरा.
या कवितेत मांडण्यात आलेल्या व्यक्तिरेखांची ओळख खालील प्रमाणे आहे:
सदाशिवराव पेशवे (भाऊ) : पानिपताच्या युद्धाचे सेनापती / चिमाजी आपा पेशवे यांचे पुत्र
विश्वासराव पेशवे : नाना साहेब पेशवे यांचे जेष्ट पुत्र
समशेर् बहाद्दर : बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांचा पुत्र
गारदी (इब्राहीमखान गारदी) : मराठ्यांचा तोफखाण्याचा प्रमुख / मूळ देश : आफ्रिका
लालमणी : सदाशीव राव पेशवे यांच्या घोड्याच नाव

संकल्पना:
युद्धात भाऊसाहेब पेशवे आणि त्यांचे मावळे यांच्याशी गळेभेट करण्यापूर्वी, युद्धाच्या आदल्या रात्री मृत्यू (यम) भाऊसाहेब पेशवे यांच्या फडात प्रवेश करतो. आणि त्यांच्याशी संवाद साधतो.
येथे मी पानिपत चे युद्धा कवितेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे, कोठे जर काही चुकीच लिहल असेल तर चुकी लक्षात आणून द्यावी.ही नम्र विनंती.

पानिपत
मृत्यू दारी आला अन् फडाबाहेर थांबला
पानिपताच्या बोचरया थंडीत गारठून गेला
माझी नजर पडताच, थोडा गहीवरुन गेला
अन् आज्ञा मिळताच फडात येऊन बसला

काही शब्द प्रेमाचे तो माझ्याशी बोलू लागला
मधेच आमच्या मर्दांगीला शाबासकी देऊ लागला
आमच्या अडचणीची त्यालाही फिकीर होती
माझ्या मावळ्याना शेवटी त्याचीच साथ होती

एकटक नुसता तो माझ्याकडेच बघत होता
खोलवर मनात त्याला "विश्वास" दिसत होता
ते कोवळ पोर जेव्हा माझ्या सोबतीला दिल
त्याच्यासाठी मुठीत माझ्या कोठून बळ आलं ?

आमची हिंमत पाहून त्याचीही छाती फुगली
रिकामी खळगी पाहून बोबडीहि थोडी वळली
का लढत होतो आम्ही ? अन् कुणासाठी ?
दिल्लीच्या रक्षणासाठी आणि वचनाला जगण्यासाठी..

गनिमहि तसा खूप कंटाळून गेला होता
छोट्याश्या एका प्याद्यासाठी तोही लढत होता
ना नफा ना तोटा त्याला मिळणार होता
सरतेशेवटी खरारा काढणार्‍यांच्या घशात जाणार होता

आदल्या दिवशी विश्वासला डोळे भरून पाहिले
त्याची कांती पाहून मग मृत्युचेही डोळे दिपले
स्त्रियांमधे "मस्तानी" तर मर्दांमधे तोच होता
दिल्लीच्या गादीवर बसणारा पहिला मर्द मराठा होता


तांबडे फुटण्याआधी यमाने माझा निरोप घेतला
कोंड्याची चतकोर भाकर खाऊन तोही तृप्त झाला
सवयी प्रमाणे मग मी बाराशे नमस्कार घातले
सूर्याला अर्ध्य देऊन मग चिलखत चढवले

पहाटे पहाटे सगळ्यानाच स्फुरण चढले
गनिम पाहून मग हात शिवशिवू लागले
गारद्यानी तोफा डागून लढाईला तोंड फोडले
"हर हर महादेवा" च्या डरकाल्या मावळे फोडू लागले

तहान भूक विसरून सगळे आग ओकू लागले
रक्ताने माखलेल्या हाताने रक्त पिऊ लागले
मर्दांगीचे भूत जणू विश्वास रावांत घुसले
भरलेल्या छाताडावर शत्रुंचे वार झेलले

विजय मला आता स्पष्ट दिसत होता
दुरुनच हसर्‍या चेहर्‍याने खुणावत होता
आनंदाने माझ्या मनी यशाच्या उकल्या फूटल्या
पुढच्या क्षणाला मग दुखाच्या ठिणग्या उडाल्या

लढता लढता माझा "विश्वास" रणांगणात हरवला
जमिनीच्या कुशीत तो मर्द मराठा सुखावला
अंबारीतुन "लालमणी" वर मग मी झेपावलो
फुरफूरनार्‍या लालमणीहून मीही गर्दीत मिसळलो

पातीला पातीला घासून आगीच्या ठिणग्या उडाल्या
तितक्याच मला गारद्यांच्या निर्जीव माना दिसल्या
कोण्या देशातला तो? का आपल्या साठी लढला?
भगव्याखाली लढणारा तोही मर्द मराठा जाहला

तिरपी किरणे सूर्याची डोळ्यावर येऊ लागली
लढता लढता डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागली
वाट माझ्या सुटकेची होती जरी मोकळी
डोळ्यांसमोर "विश्वास" ची आकृती दिसू लागली

रक्ताचा सडा जणू त्या पनिपतावर सांडला
मातृभूमीला आगळा अभिषेक मराठ्यांनी घातला
नंगी सांशेर घेऊन मग सांशेर सुद्धा खूप लढला
"बाजीरावा" चा पुत्र म्हणून रण-मैदान गाजवला

सरते शेवटी लढता लढता "समशेर्" ही मुर्च्छित पडला
शेवटच्या श्वासपर्यंत "भाऊ" च त्याला दिसला
तलवारीच्या घावांनी मग मीही शांत झालो
मृत्यूला दिलेले वचन पळून मीही निद्रीस्त झालो


:- अजय कोरपे

Thursday, June 25, 2009

वडील

निवडुंगाचा काटा कधी, कधी मायेचा कल्पवृक्ष
आशेचा दिपस्तंभ कधी, नेहमीच खात्रीचा वटवृक्ष
कोणाबध्दल बोलतोय मी? तुम्हीच कोड्यात पडलात
बोट धरून चालायला शिकवले..त्यालाच कसे विसरलात

चिमटा लकढून पोटाला, तुमच्या मुखी घास भरले
झुकले नाही कधी परिस्तिथिला, स्वाभिमानात जगले
स्वत:च्या इच्छा-स्वप्नांना शेवटी जिवंतपनी पेटवले
अंगणात वाढणार्‍या रोपट्यांना तळ्हातावर जपले

सुखी संसारासाठी ते क्षणाला काही तरी कमावत होते
तेव्हाच कधीही परत न येणारे क्षण ते गमावत होते
अंगणातल्या कळ्यांनीच त्यांच्या कष्टाचे चीज होणार होते
उमळलेली काळी पाहून एखादं स्वप्न पूर्ण होणार हॉट

कुठेतरी मनाच्या कोपर्‍यात त्यानाही एकटेपणा वाटत होता
खूप दूर जाताना त्यांच्याही पापण्या दाटत होत्या
फरक एवढाच होता की, त्यांच्या पापण्या ओलसर नव्हत्या
याचा अर्थ असा नव्हे की त्यांच्या मनात भावना नव्हत्या
:-अजय कोरपे

Thursday, June 18, 2009

कधीच नाही उमगले

कधीच नाही उमगले
नक्की असते काय प्रेम?
आगीत झोकणार्‍या पतंगासारखी
असते का अविवेकी झेप?

:- अजय कोरपे

कातरवेळी तिची शांत सावली

कातरवेळी तिची शांत सावली
आज वेगळीच भासत होती
ती जरी समोर होती
मात्र प्रियसी दिसत नव्हती
:- अजय कोरपे

माझ्या अंगणातला परिजातक

माझ्या अंगणातला परिजातक
केव्हाच सुकून गेला होता
तुझी आठवण करता करता
गंधही हरवून बसला होता
:-अजय कोरपे

दूर जाताना तुला काही देण्यासाठी

दूर जाताना तुला काही देण्यासाठी
माझ्याकडे काहीच शिल्लक नव्हते
म्हणूनच शेवटचे काही अश्रू
तुझ्याच साठी जपून ठेवले होते
:- अजय कोरपे