Showing posts with label माझ्या कविता. Show all posts
Showing posts with label माझ्या कविता. Show all posts

Sunday, July 19, 2009

आठवणी

अशाच आठवणी मग ऋतू बदलतात
ग्रीष्मातल्या पानांप्रमाणे त्याही सुकून जातात
हिरवा रंग प्रेमाचा विरळ होत जातो
जाळीदार पानांप्रमाणे मनाला छिद्रे पडतात

खूप यत्न केला तरी छिद्रे भरत नाहीत
रडावस वाटल तरी आसव गळत नाहीत
डोळे मिटले की भूतकाळात मन धावत
म्रुगजळामागे पळताना वेड मन थकत

अशा वेळी वाटत नको त्या आठवणी
नको ते डोळ्यात काठोकाठ भरलेले पाणी
तेव्हा कोठे अंधार्‍या रात्रीसारख हसावस वाटत
एखादा तारा तुटल्यावर काजव्यांशी खेळावस वाटत
:- अजय कोरपे


Friday, July 10, 2009

पानिपत(Panipat) - (तिसरे युद्ध: मराठा - अहमदशाह अब्दाली)

छत्रपती शिवाजी महाराज यानी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या सीमा अटकेपार नेणार्‍या पेशव्यांच्या काळात पानिपताच्या मैदानात घडलेल्या मराठा आणि अहमदशाह अब्दाली यांच्या युद्धात मराठयांची एक संपूर्ण पिढी मारली गेली. त्या युद्धात वीरमरण पावलेल्या सर्व ज्ञात आणि अज्ञात सैनिकांना माझा मानाचा मुजरा.
या कवितेत मांडण्यात आलेल्या व्यक्तिरेखांची ओळख खालील प्रमाणे आहे:
सदाशिवराव पेशवे (भाऊ) : पानिपताच्या युद्धाचे सेनापती / चिमाजी आपा पेशवे यांचे पुत्र
विश्वासराव पेशवे : नाना साहेब पेशवे यांचे जेष्ट पुत्र
समशेर् बहाद्दर : बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांचा पुत्र
गारदी (इब्राहीमखान गारदी) : मराठ्यांचा तोफखाण्याचा प्रमुख / मूळ देश : आफ्रिका
लालमणी : सदाशीव राव पेशवे यांच्या घोड्याच नाव

संकल्पना:
युद्धात भाऊसाहेब पेशवे आणि त्यांचे मावळे यांच्याशी गळेभेट करण्यापूर्वी, युद्धाच्या आदल्या रात्री मृत्यू (यम) भाऊसाहेब पेशवे यांच्या फडात प्रवेश करतो. आणि त्यांच्याशी संवाद साधतो.
येथे मी पानिपत चे युद्धा कवितेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे, कोठे जर काही चुकीच लिहल असेल तर चुकी लक्षात आणून द्यावी.ही नम्र विनंती.

पानिपत
मृत्यू दारी आला अन् फडाबाहेर थांबला
पानिपताच्या बोचरया थंडीत गारठून गेला
माझी नजर पडताच, थोडा गहीवरुन गेला
अन् आज्ञा मिळताच फडात येऊन बसला

काही शब्द प्रेमाचे तो माझ्याशी बोलू लागला
मधेच आमच्या मर्दांगीला शाबासकी देऊ लागला
आमच्या अडचणीची त्यालाही फिकीर होती
माझ्या मावळ्याना शेवटी त्याचीच साथ होती

एकटक नुसता तो माझ्याकडेच बघत होता
खोलवर मनात त्याला "विश्वास" दिसत होता
ते कोवळ पोर जेव्हा माझ्या सोबतीला दिल
त्याच्यासाठी मुठीत माझ्या कोठून बळ आलं ?

आमची हिंमत पाहून त्याचीही छाती फुगली
रिकामी खळगी पाहून बोबडीहि थोडी वळली
का लढत होतो आम्ही ? अन् कुणासाठी ?
दिल्लीच्या रक्षणासाठी आणि वचनाला जगण्यासाठी..

गनिमहि तसा खूप कंटाळून गेला होता
छोट्याश्या एका प्याद्यासाठी तोही लढत होता
ना नफा ना तोटा त्याला मिळणार होता
सरतेशेवटी खरारा काढणार्‍यांच्या घशात जाणार होता

आदल्या दिवशी विश्वासला डोळे भरून पाहिले
त्याची कांती पाहून मग मृत्युचेही डोळे दिपले
स्त्रियांमधे "मस्तानी" तर मर्दांमधे तोच होता
दिल्लीच्या गादीवर बसणारा पहिला मर्द मराठा होता


तांबडे फुटण्याआधी यमाने माझा निरोप घेतला
कोंड्याची चतकोर भाकर खाऊन तोही तृप्त झाला
सवयी प्रमाणे मग मी बाराशे नमस्कार घातले
सूर्याला अर्ध्य देऊन मग चिलखत चढवले

पहाटे पहाटे सगळ्यानाच स्फुरण चढले
गनिम पाहून मग हात शिवशिवू लागले
गारद्यानी तोफा डागून लढाईला तोंड फोडले
"हर हर महादेवा" च्या डरकाल्या मावळे फोडू लागले

तहान भूक विसरून सगळे आग ओकू लागले
रक्ताने माखलेल्या हाताने रक्त पिऊ लागले
मर्दांगीचे भूत जणू विश्वास रावांत घुसले
भरलेल्या छाताडावर शत्रुंचे वार झेलले

विजय मला आता स्पष्ट दिसत होता
दुरुनच हसर्‍या चेहर्‍याने खुणावत होता
आनंदाने माझ्या मनी यशाच्या उकल्या फूटल्या
पुढच्या क्षणाला मग दुखाच्या ठिणग्या उडाल्या

लढता लढता माझा "विश्वास" रणांगणात हरवला
जमिनीच्या कुशीत तो मर्द मराठा सुखावला
अंबारीतुन "लालमणी" वर मग मी झेपावलो
फुरफूरनार्‍या लालमणीहून मीही गर्दीत मिसळलो

पातीला पातीला घासून आगीच्या ठिणग्या उडाल्या
तितक्याच मला गारद्यांच्या निर्जीव माना दिसल्या
कोण्या देशातला तो? का आपल्या साठी लढला?
भगव्याखाली लढणारा तोही मर्द मराठा जाहला

तिरपी किरणे सूर्याची डोळ्यावर येऊ लागली
लढता लढता डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागली
वाट माझ्या सुटकेची होती जरी मोकळी
डोळ्यांसमोर "विश्वास" ची आकृती दिसू लागली

रक्ताचा सडा जणू त्या पनिपतावर सांडला
मातृभूमीला आगळा अभिषेक मराठ्यांनी घातला
नंगी सांशेर घेऊन मग सांशेर सुद्धा खूप लढला
"बाजीरावा" चा पुत्र म्हणून रण-मैदान गाजवला

सरते शेवटी लढता लढता "समशेर्" ही मुर्च्छित पडला
शेवटच्या श्वासपर्यंत "भाऊ" च त्याला दिसला
तलवारीच्या घावांनी मग मीही शांत झालो
मृत्यूला दिलेले वचन पळून मीही निद्रीस्त झालो


:- अजय कोरपे

Thursday, June 25, 2009

वडील

निवडुंगाचा काटा कधी, कधी मायेचा कल्पवृक्ष
आशेचा दिपस्तंभ कधी, नेहमीच खात्रीचा वटवृक्ष
कोणाबध्दल बोलतोय मी? तुम्हीच कोड्यात पडलात
बोट धरून चालायला शिकवले..त्यालाच कसे विसरलात

चिमटा लकढून पोटाला, तुमच्या मुखी घास भरले
झुकले नाही कधी परिस्तिथिला, स्वाभिमानात जगले
स्वत:च्या इच्छा-स्वप्नांना शेवटी जिवंतपनी पेटवले
अंगणात वाढणार्‍या रोपट्यांना तळ्हातावर जपले

सुखी संसारासाठी ते क्षणाला काही तरी कमावत होते
तेव्हाच कधीही परत न येणारे क्षण ते गमावत होते
अंगणातल्या कळ्यांनीच त्यांच्या कष्टाचे चीज होणार होते
उमळलेली काळी पाहून एखादं स्वप्न पूर्ण होणार हॉट

कुठेतरी मनाच्या कोपर्‍यात त्यानाही एकटेपणा वाटत होता
खूप दूर जाताना त्यांच्याही पापण्या दाटत होत्या
फरक एवढाच होता की, त्यांच्या पापण्या ओलसर नव्हत्या
याचा अर्थ असा नव्हे की त्यांच्या मनात भावना नव्हत्या
:-अजय कोरपे

Monday, May 25, 2009

माझ्या आयुष्यात येणारी परी

माझ्या आयुष्यात येणारी परी
खरच कशी हो असेल?
माझ्या इवल्याशा साम्राज्याची
खरच का सम्राज्ञी ती शोभेल?

नाकी डोळी रेखीव असेल की
मनानेही तेवढीच सुंदर असेल?
माझ्या इवल्याशा घरट्याला का
आपल मानणारी असेल?

शृंगार करणारी असेल की
कंबरपण कसणारी असेल?
संसाराच्या गाड्याला ती का
अखंड साथ देणारी असेल?

खूप बडबड करणारी असेल का
माझही कधी ऐकून घेणारी असेल?
मी लपविलेल्या अश्रूना का
पदरात पाडून घेणारी असेल?

असे खुळे प्रश्न सध्या
काळ्या आकृतींना विचारतोय
मित्रसुद्धा चेष्टेने विचारतात
"मधेच कोणाशी बोलतोय?"

काय सांगू त्याना मी
तुझीच वाट पाहतोय
जिला कधीच पहिले नाही
तिच्यावर जीवपाड प्रेम करतोय

:- अजय कोरपे

Sunday, May 10, 2009

कातरवेळ आणि समुद्रकिनारा

कातरवेळी समुद्राकाठी मला
सुंदर कविता सुचली
हाती पेन पेन्सिल नसल्याने
वाळुतच ती मी लिहिली

अशी कविता क्वचितच
कोणी केली असावी
जी वाचण्यासाठी सुर्यानेही
मावळतिची वेळ वाढवली

जे जे काही मनात होते
ते सर्व काही वाळूत कोरले
मनातल्या भावनांचे कोठार
काही क्षणात रिकामे झाले

सुंदर अशी कलाकृती
त्या वाळूत साकार झाली
ढगात लपलेल्या चंद्राची
मग उत्कंठा शिगेला पोहचली

आजूबाजूचे सर्व काही
त्या कवितेत तल्लीन झाले
त्याना जोडीला लाटेचे
छान पार्श्व-संगीत लाभले

काही क्षणात सागराला
तुफान भरती येणार होती
अभय दिलेल्या शब्दाना आता
जीवंत समाधी मिळणार होती

लाटेंच्या तडाख्यात प्रत्येक
शब्द धारतीर्थी पडला होता
फेसाळलेल्या लाटांत मी
शब्द जोडू लागलो होतो

अजूनही ते शब्द जोडण्यासाठी रोज
कातरवेळी समुद्राकाठी जातो
पुन्हा नवीन कविता रचून
तिला वाळूत पुरून येतो
:-अजय कोरपे

Thursday, May 7, 2009

प्रेमाची गाडी

माझ्या स्वप्नांवर तिचा
जागता पहारा असतो
तिच्या नजरेचा वेध
माझ्या ह्रदयावर असतो

असं वाटत आता
सुटतील तिच्या नजरेतून शब्द
आणि करतील सार विश्व
एका क्षणात स्तब्ध

डोळे बंद करून तिच्या
मनात शिरण्याचा यत्न करतो
पून्हा अयशस्वी प्रयत्न माझा
नेहमी प्रमाणे फसतो

थेट तिच्या मनाची वाट
कधीच नाही सापडली
माझी प्रेमाची गाडी
पून्हा एकदा घसरली
:- अजय कोरपे

Sunday, April 26, 2009

पाठलाग

असाच कित्येक वेळ
विचार करत बसतो
मनातल्या विचारांचा
पाठलाग करू लागतो

पाठलाग करून मात्र
काहीच हाती लागत नाही
जिथून सुरवात केली
तेथेच येऊन थांबतो
:- अजय कोरपे

तुझी आठवण

असे का व्हावे? की
मावळतीचा सूर्य पहिल्यावर
तुझीच आठवण यावी.....

तुझ्या गालावरची लाली
तांबड्या सूर्याला चढावी

मग ती सूर्यकीरणे
तांबट केसांसारखी भासावी

अंगावर अलगद पडू लागताच
उभी कांती शाहरूण जावी

:- अजय कोरपे

Friday, April 24, 2009

आयुष्य

खूप सोप असत आयुष्य
आपणच गुंता करून ठेवतो
उठल्या बसल्या नुसत
नशिबाला दोष देत बसतो १

जन्मा-मरणा मधली सरळ रेष
म्हणजे असते आयुष्य
आपणच वेडी वाकडी वळणे घेत
अंतर वाढवून ठेवतो २

झर्‍यासारख खळखळत राहण
म्हणजे असते आयुष्य
आपणच डबक्यासारख थांबून
चिखल करून ठेवतो ३

आकाशाहून विशाल मन
म्हणजे असते आयुष्य
आपणच चार भिंतीत राहून
मने संकुचित करतो ४

दिव्यात जळणार्‍या ज्योतीएवढ
उबदार असते आयुष्य
आपणच त्यात तेल ओतून
वणवा पेटवून देतो ५

हातातला घास दुसर्‍यांना देणे
म्हणजे असते आयुष्य
आपणच घास हिरावून घेऊन
मने दुखवून बसतो ६

चन्दनापरी झिजने
म्हणजे असते आयुष्य
हसता हसवता अश्रू लपविणे
म्हणजे असते आयुष्य ७
:- अजय कोरपे